‘त्या ‘ अपघातग्रस्ताच्या अस्थिवरच केला अंत्यसंस्कार : लावारी येथील ह्रदयस्पर्शी घटना

कपड्यात गुंडाळलेले अवशेष पाहताच आप्तेष्ठानी फोडला हंबरडा
 कमावताच्या अकाली निधनाने कुटुंबीय झाले विवश

विसापूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर तालुक्यातील बल्लारपूर -कोठारी मार्गावरील लावारी गाव. गावाची लोकसंख्या सहाशेच्या आसपास. बहुतेक कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे. तेच त्यांचे पालनपोषण करण्याचे एकमेव साधन.गावातील सहा मजूर एका लाकूड व्यवसायिकाकडे ट्रक वर लाकूड भराई करने व खाली करने. हे काम करत होते. गुरुवारी ते सकाळी नेहमी प्रमाणे कामाला गेले. गावाकडे परतीच्या वाटेवर असताना, त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघातात त्यांचा होरपळून कोळसा झाला. होत्याचे नव्हते झाले. घरातील कमावता अकाली गेल्याने कुटुंब विवश झाले. लावारी गावातील ही घटना मनसुन्न करणारी ठरली. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता त्यांच्या केवळ अस्थीच गावात आल्या, अन साऱ्यांनी एकच हंबरडा फोडला. लावारी येथील गावाकऱ्यांना ‘ त्या ‘अपघातग्रसतांच्या अस्थिवरच साश्रूनयणांनी अंत्यसंस्कार करण्याची वेळ नियतीने आणली.

बल्लारपूर तालुक्यातील लावारी येथील मंगेश प्रल्हाद टिपले (३९), साईनाथ बापूजी कोडापे (४२), महिपाल आनंदराव मडचापे (२७), प्रशांत मनोहर नगराळे (३६), बाळकृष्ण तुकाराम तेलंग (५०) रा. लावारी ता. बल्लारपूर व गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव येथील संदीप रवींद्र आत्राम (२२)असे असे मृतक मजुरांची नावे आहे.याच अपघातात ट्रक चालक अक्षय सुधाकर डांगरे (३१) रा. बल्लारपूर यांचा देखील भीषण अपघातात मृत्यू झाला.

बल्लारपूर येथील हितेश मोगरे यांच्याकडे सर्वजण मजुरीने काम करत होते. गुरुवारी सकाळी ट्रकने गडचिरोली जिल्ह्यतील वडसा ( देसाईगंज )येथे लाकूड भराईसाठी सर्वजण गेले. ट्रक मध्ये लाकूड भरून ते बल्लारपूर कडे येत होते. रात्री ११ वाजता दरम्यान चंद्रपूर – मूल मार्गांवर अजयपूर जवळ ट्रक व डिझेल टंकर मध्ये जबरदस्त धडक झाली. छणात दोन्ही वाहने आगीच्या भक्षस्थानी आले. या भीषण अपघातात तब्बल नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील लावारी गावातील पाच जणांचा समावेश आहे. यामुळे अख्खे गावच शोकसागरात बुडाले.
लावारी येथील मंगेश टिपले, साईनाथ कोडापे, महिपाल मडचापे, प्रशांत नगराळे, बाळकृष्ण तेलंग व संदीप आत्राम यांनी दीड दोन तासात घरी येतो, म्हणून घरच्यांना सांगितले. मात्र शुक्रवारी रात्री त्यांच्या अस्थीच गावात पोहचल्याने कुटुंबियांनी व आप्तेष्ठानी एकच हंबरडा फोडला. चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातून एका वाहनाने मृतकाच्या अस्थी आणल्या. पांढऱ्या कापडात गुंडाळल्या अस्थीचे नाव ऐकूण आप्तेष्ट हंबरडा फोडत होते. कुटुंब व आप्तेष्टना अंत्यसंस्कार वेळी चेहरा देखील पाहता आला नाही. गावातील हे चित्र मनसून्न करणारे होते. ह्रदयस्पर्शी होते. लावारी येथील या घटनेमुळे कुटूंबाचा आधार गेला. नातेवाईक व आप्तेष्ट विवश झाले. काहीचा अर्ध्यावरती संसाराचा डाव मोडला. बल्लारपूर तालुक्याच्या पंचक्रोशीत एकाच गावातील पाच जणांच्या अस्थिवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याची, ह्रदयहेलावणारी घटना पहिल्यांदा घडली.