ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा : कर्मचारी युनियनचे बिडीओना निवेदन

मागणी त्वरित मान्य करण्याची मागणी

विसापूर (प्रतिनिधी) – बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहेत. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यासोबत ग्रामपंचायत कर्मचारी गावासाठी महत्वाचा घटक आहे. ग्रामपंचायत पातळीवर प्रत्येक गावासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शासनाने शासन निर्णयाद्वारे किमान वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, अशी मागणी बल्लारपूर तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन च्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे किमान वेतन देण्याची मागणी केली. मागणीची पूर्तता करा म्हणून निवेदन देऊन आंदोलन केली.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाने शासन निर्णय काढला. मात्र आजतागायत शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिणामी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन म्हणून ११ हजार ६२५ ते १२ हजार ६६५ रुपये किमान वेतन लागू केले आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.या मागणीचे निवेदन बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांना देण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन त्वरित लागू करा, अशी आग्रही मागणी केली आहे. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष रेखा देरकर, उपाध्यक्ष संतोष निपुंगे, सचिव वर्षा मांढरे,प्रेमकुमार गेडाम,हेमदेव कुळमेथे,अजय निंबाळकर, गजानन मडावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कर्मचारी गावापातळीवर शासनाचा महत्वाचा दुवा आहे. गावाच्या विकासात त्याची भूमिका महत्वपूर्ण आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून अहोरात्र सेवा दिली आहे. शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन लागू केले आहे. याची अंमलबजावणी त्वरित करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.
– संतोष निपुंगे
उपाध्यक्ष, ग्रामपंचायत युनियन, तालुका बल्लारपूर.