पिडीत नागरिकांना भविष्यात सुरक्षित जागा द्या

तात्पुरत्या स्वरूपात वेकोलीने त्यांच्या वसाहतीमध्ये सामावून घ्यावे

खासदार बाळू धानोरकर यांची घटनास्थळाला भेट देऊन अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

चंद्रपूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील घुग्गुस येथील आमराई वॉर्डांत भूस्खलन झाल्याने एका नागरिकाचे घर जमिनीत गेले. या घटनेची पाहणी करण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट दिली. या भागातील पिडीत नागरिकांना भविष्यात सुरक्षित जागा मिळावी त्याकरिता त्यांना महसूल व नगर परिषद प्रशासनाने समन्वयाने प्राधान्याने पट्टे देण्यात यावेत तसेच तात्पुरत्या स्वरूपात वेकोलीने त्यांच्या वसाहतीमध्ये सामावून घ्यावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.

यावेळी वेकोलिचे महाप्रबंधक आभाचंद्र सिंग, तहसीलदार गौंड , नगर परिषद मुख्याधिकारी पिदूरकर, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष ग्रामीण प्रकाश देवतळे, तालुका काँग्रेस अध्यक्ष शामकांत थेरे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, किसान सेलचे अध्यक्ष रोशन पचारे, काँग्रेस युवा नेते पवन अगदारी, जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांची यावेळी उपस्थिती होती.

घुग्घुस येथील अमराई वार्डात राहणार्‍या श्री. गजानन मडावी यांचे राहते घर काल सायंकाळच्या सुमारास अचानक पणे भूस्खलन होऊन जमिनीखाली गाडल्या गेले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच तातडीने याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळाजवळचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिने जवळपास राहणार्‍या अनेक कुटुंबांची व्यवस्था स्थानिक जि. प. शाळेत करण्यात आली आहे.

यासंदर्भात वेकोचे महाप्रबंधक अभाचंद्र सिंग व तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्याशी बैठक वेकोलिच्या विश्रामगृहात घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी खासदार बाळू धानोरकर यांना बाधित जागेच्या नकाशा दाखवून पर्यायी व्यवस्थांबाबत चर्चा केली. सन १९५० ते सन १९८४ पर्यंत या भागामध्ये अंडरग्राउंड कोळसा खाण होती. त्यानंतर या ठिकाणी खुली खदान सुरु झाली. पूर्वीच्या अंडरग्राउंडच्या दोन गॅलरी जंक्शन मध्ये हा भाग खचला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्याची गरज आहे. नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वेकोली अधिकाऱ्यांसोबत बसून चर्चा करून तोडगा काढून योग्य त्या सूचना करून पुढील कारवाई केली जाईल असेही यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.