……अखेर चोवीस तासानंतर काजलचा मृत्यदेह मिळाला

सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलावाच्या नहरातील घटना

सावली (प्रतिनिधी): तालुक्यातील आसोला मेंढा नहरामधुन लहान भावंडाला वाचविण्यासाठी काजल मक्केवार ही पाण्यात गेली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती वाहुन गेली, तिला शोधण्यासाठी प्रशासनाने शोध मोहीम राबविली होती, अखेर 24 तासानंतर सिंगापूर पासुन अर्धा किमी अंतरावर काजल मक्केवार वय 11 वर्ष हिचा मृत्यदेह आढळुन आला आहे

सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलावाजवळ असलेल्या वस्तीमधील महिला कपडे धुण्यासाठी शुक्रवारी नहरावर गेल्या होत्या. त्यांच्या मागे काजल तिची बहीण सुस्मिता व भाऊ राहुल मक्केवार आणि त्याचे मित्र रोहित, अनुराग नहरावर गेले होते. नहराच्या पायरीवर असताना राहुलचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी काजल, सुस्मिता व मित्रांनी नहरात उडी घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह मोठया प्रमाणावर असल्याने हे सर्वच वाहत जाऊ लागले. वाहत जात असताना नहरावरील महिलांनी आरडाओरड करून जवळ असणाऱ्या नागरिकांना बोलावले. दरम्यान संतोष राऊत व विशाल दुधे यांनी नहरात उडी घेऊन चार मुलांना नहराच्या प्रवाहातून बाहेर काढले. परंतु काजल पाण्याच्या प्रवाहात शुक्रवारी 10 वाजता दरम्यान वाहत गेली.

सदर घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच बोटीद्वारे शोधकार्य सुरू करून संपूर्ण नहराचा परिसर पिंजून काढला. मात्र काजलचा पत्ता लागला नाही. परंतु प्रशासनाने शोधकार्य सुरूच ठेवले असता 24 तासानंतर शनिवार सिंगापूर पासुन अर्धा किमी अंतरावर काजल चा मृत्यदेह तरंगताना आढळून आला. सदर माहिती पोलीस प्रशासनास मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

पुढील तपास सावलीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चीचघरे, मडावी, पोलीस हवा धीरज पिदुरकर, दीपक चव्हाण, लाटकर, दासरवार, मृतकाच्या कुटुंबातील नातेवाईक, जलतरणपटू नितीन पाल व त्यांची चमू यांनी शोध कार्यात मदत केली.