जन्मदात्या पित्यानेच केला पोटच्या मुलांचा खून

वरोरा (प्रतिनिधी): शहरात आज हृदय हेलावून टाकणारी घटना घडली.नागपूर चंद्रपूर महामार्गावर असलेल्या शालिमार ट्रेडर्स च्या मागील वसाहतीत राहणाऱ्या कांबळे कुटुंबियातील मिष्ट्री संजय कांबळे वय 3 वर्ष व अस्मिन संजय कांबळे वय 5 वर्ष यांची हत्या जन्मदात्या पिता संजय श्रीराम काबळे वय अंदाजे 40 याने केल्याची घटना 2 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

संजय कंबळे हा सुशिक्षित असून बेरोजगारी ने त्रस्त झाला होता.त्यामुळे मागील काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली असल्याचे कळते .तर पत्नी सविता डी फार्म कॉलेज मध्ये लॅब अटेंडट म्हणून काम करत होती. घटनेच्या दिवशी मुलगा अस्मिन हा बोर्डा येथील रहिवासी आजोबा यांच्याकडे राहत होता. दुपारच्या सुमारास वडील संजय मुलाला घेऊन त्याचे किरायाने असलेल्या शालिमार ट्रेडर्स च्या मागील वसाहतीत घेऊन गेला.आजीलाही वडील मुलाला घेऊन गेल्याने खाऊ घेऊन परत आणून सोडतील या आशेने दुर्लक्ष केले. मात्र घरी नेताच संजय ने मुलगी मिष्ट्री आणि अस्मिन याला विषारी द्रव्य पाजल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर अस्मिन यांच्या गळ्याभोवती व पाठीवर मारल्याच्या खुणा असल्याने विष पाजल्यावर अस्मिन च्या गळ्याखाली विषयुक्त द्रव्य उतरावे यासाठी प्रयत्न करतानाचा खुणा प्रथम दर्शी दिसून येत आहे.

मुळचा समुद्रपूर तालुक्यातील कोरा साखरा येथील संजय कांबळे हा रहिवासी असून तो गेल्या दोन वर्षांपासून कोरोणा काळामध्ये ट्युशन बंद पडल्याने मानसिक स्थिती बरोबर नसल्याने त्याने हा प्रकार केला तर नसावा ना किंवा पती पत्नीच्या कौटुंबीक वादातुन या निरागस मुलांची हत्या घडून आली असावी असाही तर्क लावल्या जात आहे. एकंदरीत पाहता सादर घटनेमुळे वरोरा शहरात या निरागस मुलांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केल्या जात आहे. वृत्त लिहे पर्यंत पोलीस आरोपी संजय कांबळे याच्या मागावर असून उपजिल्हा रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी ,पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे ,सहायक पोलीस निरीक्षक निलेश चवरे ,पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार ,गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी धनराज करकाडे हे रुग्णालयात दाखल झाले असून या निरागस मुलांचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे ठोस निदान लागावे म्हणून शव विच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते.