वनमंत्र्याच्या गृहक्षेत्रातुन अवैध गोवंश तस्करीला वेग

पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

मूल (प्रतिनिधी) : गेल्या अनेक महिण्यापासुन गडचिरोली जिल्हयातुन अवैध गोवंश जनावरे वाहतुक करुन मूल, पोंभुर्णा मार्गे बल्लारशहाकडे नेत असतांनाही पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरीकांमध्ये तिव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. गोवंश जनावरे तस्करी होत असलेले तालुके हे राज्याचे वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे गृहक्षेत्र आहे.

गडचिरोली जिल्हयातुन अवैध गोवंश जनावरे वाहतुक करीत असताना सावली पोलीस स्टेशनच्या सर्तकतेमुळे तस्करी करणाऱ्यांवर अनेकदा कारवाई करण्यात आली, यामुळे शेकडो जनावरांची सुटका करण्यात आली, सदर गोवंश जनावरे मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर वरून आध्रप्रदेशामध्ये वाहतुक केली जाते, आठवडयातुन किमान 2 वेळा गोवंश जनावरांना ट्रकमध्ये कोंबुन नेत असल्याने अनेक गोवंश जनावरांचा श्वास गुदमरल्याने मृत्युमुखी पडत असल्याचे बोलले जाते. परंतु हे पकडण्याचे सत्र  पोलीस करीत नसल्याचे दिसून येत आहे. मूल तालुक्यतील काही गांवामधुनही मोठया प्रमाणावर गोवंश  तस्करी केल्या जात असतानाही त्याकडे कानाडोळा करण्याचे कारण काय? असा संतप्त सवाल आता नागरीक करीत आहे.

राज्यात गोधनावर लम्पी चर्मरोगाचा संसर्ग वाढत चाललेला आहे, शासनाने याबाबत कठोर पाउल उचलत प्रत्येक जिल्हयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन 1 कोठी रूपयाची तरतुद करण्यात आली आहे. असे असतानाही परराज्यातुन जिल्हयात गोवंश जनावरे तस्करी केल्या जात असल्यामुळे सदर संसर्गाचा फैलाव परिसरात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हयातुन होणारे गोवंश तस्करीचा पर्दापण करण्यासाठी प्रशासनाने कठोर पाउल उचलण्याची आवश्यकता असुन क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष दिल्यास गोवंश तस्करी थांबु शकते ऐवढे नक्की.