पट्टेदार वाघाच्या तावडीतून मुलाने केली वडीलाची सुटका

काठीचा हिसका दाखविताच वाघाने ठोकली धूम : चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय उपचारार्थ केले दाखल

चिमूर (प्रतिनिधी) : ताडोबा अभयारण्याबाहेर असलेल्या पट्टेदार वाघांच्या मुक्तसंचाराने मानव व वन्यप्राण्यांमध्ये प्रचंड संघर्ष वाढला आहे. या संघर्षातून कधी जंगलात तर कधी जंगलाबाहेर शेतकरी, शेतमजूर, नागरिकांचे वन्यप्राणी बळी घेत आहे. अशी एक घटना आज मंगळवारी (13 सप्टेंबर) ला दुपारच्या सुमारास चिमूर तालुक्यातील सातारा शेतशिवारात घडली. स्वत:च्या घरचे जनावरे चारण्याकरीता घेऊन गेलेल्या एका 65 वर्षीय शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला, परंतु जवळच असलेल्या मुलाने पट्टेदार वाघावर काठी हाणल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याने वडिलाचे जीव वाचले. मुलाने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता वडिलाचा जीव वाचविल्याने त्यांच्या धाडसाचे कौतूक होत आहे. गोविंदा वारलू चौखे असे वडिलाचे तर श्रीकृष्ण गोविंदा चौखे असे कतृत्ववान मुलाचे नाव आहे.

घटनेची हकीकत अशी की, चिमूर तालुक्याच्या ठिकाणापासून 10 किमी. अंतरावर ताडोबा अभयारण्याच्या बफरझोन लगत छोटेसे सातारा गाव वसले आहे. गोविंदा वारलू चौखे हे सातारा येथील रहिवासी आहेत. सातारा गावापासून अर्धा किमी. अंतरावर बफरझोन लगत त्यांचे शेत आहे. त्यांना जनावरे असल्याने ते स्वत:च्या शेतशिवाराकडे नेहमीच चारायला घेऊन जातात. आज मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास गोविंदा चौखे हे मुलगा श्रीकृष्ण सोबत पाचसहा जनावरे चारायला घेऊन गेले होते. त्याच्या शेताला लागूनच ताडोबाचे बफरझोन आहे. शिवाय कोलारा गेट एक किमी. अंतरावर आहे. नेहमीच बफरझोनबाहेर पट्टेदार वाघांचे वास्तव्य असते. शेतकऱ्यांना त्यांचे दर्शनही नित्याचीच बाब झाली आहे. बळी घेतल्याच्या घटनाही घडत आहेत. परंतु शेती व शेतीची संलग्नीत कामे शेतकऱ्यांना जिव संकटात टाकून करावी लागत आहेत. आज मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास वडिल गोविंदा व मुलगा श्रीकृष्ण दोघेही जनावरे चारायला घेऊन गेले होते. दुपारपर्यंत जनावरे चारली. शेत जंगलाला लागून आहे. याच जंगलालगत पट्टेदार वाघ दडून बसला होता. दिवसभर पाऊस सुरू असल्याने जंगलालगत जनावरे चरत असतांना दुपारी दोनच्या सुमारास पट्टेदार वाघाने थेट वडिलावर हल्ला चढविला. हल्ला होताच वडिलांनी प्रचंड आरडाओरड सुरू केला. वडिलांपासून काही अंतरावर मुलगा श्रीकृष्ण हातात काठी घेऊन जनावरांची राखण करीत होता. आरडाओरडण्याचा आवाज ऐकताच तो वडिलांना वाचविण्याकरीता हातात काठी घेऊन धावून आला. पाठीवर व हाताला पट्टेदार वाघाने हल्ला केल्याचे त्याचे निदर्शनास येताच थेट काठी पट्टेदार वाघावर हाणली. प्रचंड आरडाओरड झाली. काठीच्या वाराने वाघही घाबरला आणि वडिलांना सोडून जंगलाच्या दिशेने पट्टेदार वाघाने धूम ठोकली. प्रचंड ओरडण्याचा आवाज आल्याने लगतचे शेतकरी धावून आलेत. मान व पाठीवर वाघाने हल्ला केल्याने वडिल जखमी झालेत. लगेच वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाची चमू घटनास्थळी काही वेळातच दाखल झाली. वनविभागाच्या वाहनाने त्याला लगेच चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. चिमूर येथे प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

स्वत:च्या जिवाची पर्वा न मुलांचा जिव की प्राण वाचविण्याकरीता वडिल नेहमीच पुढे असतो. मात्र आज मंगळवारी म्हाताऱ्या वडिलाला पट्टेदार वाघाच्या तावडीतून वाचविण्याकरीता मुलगा श्रीकृष्ण याने केलेले धाडस सर्वत्र वाखानण्याजोगे आहे. मुलगा नसता तर पुन्हा एका वडिलाचा वन्यप्राण्याच्या हल्यात बळी गेला असता. सुदैवाने वडिलांची प्रकृती स्थिर आहे. तर मुलगाही सुरक्षित आहे. सातारा गाव व परिसरात मुलगा श्रीकृष्णच्या धाडसाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.सातारा गावचे सरपंच व वनसमिती अध्यक्ष गजू गुळधे यांनी वाघाच्या बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.