स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी तहसिल कचेरीवर गावकरी धडकले

शासकीय धान्य चोरी प्रकरणी एक वर्षांसाठी दुकानदाराला केले होते निलंबीत

पोंभूर्णा (प्रतिनिधी) : तालुक्यातील चेक ठाणेवासना येथील मागील एक वर्षापासून निलंबीत असलेल्या दुकानदारालाच सरकारी स्वस्त धान्य दुकानाचे नव्याने पुर्ववत सुरू करण्यासाठीचा प्रशासकीय आदेश आल्याने चेक ठाणेवासना येथील ग्रामस्थ स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठीची मागणी घेऊन पोंभूर्णा तालुका कचेरीवर गावकरी येवुन धडकले. शेकडोच्या संख्येने जमा झालेले महिला व पुरुषांनी मागणी मान्य न झाल्यास धान्याच्या उचल करण्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनातून स्पष्ट केले आहे. व मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

तालुक्यातील चेक ठाणेवासना येथील शासकीय स्वस्त धान्य दुकान शिला कवडू काहाळे यांचे नावाने दुकान चालवण्याचा परवाना होता. मात्र सदर दुकानदार वाटपासाठी आलेला राशन हा लाभार्थ्यांना न देता तो परस्पर विक्री करीत होता. ग्राहकांना सेवा न देणे, लाभार्थ्यांकडून घरचे काम करून घेणे नंतरच धान्य देणे असे अनेक उपद्रव संबंधित दुकानदार करीत होता. इलेक्ट्रीक वजन काटा न ठेवणे, स्टाक बुक न ठेवणे, शासनाची दिशाभूल करीत मयत व्यक्तीच्याही नावाने धान्याची अफरातफर करणे असे प्रकार सुरू होते. कोवीड काळात “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” अंतर्गत धान्याचे मोजके वाटप करणे, शिल्लक माल खुल्या बाजारात विकणे असा प्रताप सुरू होता. ग्रामपंचायत सदस्य वैभव पिंपळशेंडे व ग्रामस्थांनी अन्न व नागरी पुरवठा आयुक्त यांचे कडे तक्रार देण्यात आली. त्या तक्रारीची दखल घेत तत्कालीन तहसीलदार यांनी सदर दुकानदाराला शासकीय धान्याची चोरी करताना पकडले व त्यांचे दुकान १ वर्षासाठी निलंबीत केले. मात्र पोंभूर्णा तहसिल कार्यालयाकडून देण्यात आलेल्या चौकशी अहवालात दुकानदार शिला कवडू काहाळे या पुर्ण दोषी आढळले असतांना सुद्धा एक वर्षानंतर त्याच दुकानदाराला दुकान पुर्ववत सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आदेश देण्यात आले. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सदर दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी पोंभूर्णा तहसिल कचेरीवर मोर्चा काढला. सदर परवाना तात्काळ रद्द न झाल्यास पुर्ण गावकरी संबंधित शासकीय स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचल करण्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनातून भुमिका स्पष्ट केले. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण गावकरी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.