समाजमाध्यमावरून महिलेची बदनामी : मूल येथील एकास अटक

दोन दिवसाची पोलिस कोठडी, चिमूर पोलिसांची कारवाई

चिमूर (प्रतिनिधी) : चिमूर शहरातील एका विवाहित महिलेची समाजमाध्यमाच्या सहायाने एका व्यक्ती सोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. याच मैत्रीचा फायदा घेते महिलेचे अश्लिल फोटो काढून समाजमाध्यमावर पोस्ट केले. या प्रकरणाची महिलेने पोलिसात तक्रार करताच चिमूर पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींना अटक केली आहे. लवकुश विलास खोब्रागडे मूल असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात सादर करण्यात आले असून दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

चिमूर शहरातील एका विवाहित महिलेची काही महिन्यांपूर्वी लवकुश खोब्रागडे नामक इसमासोबत समाजमाध्यमाद्वारे (सोशल मिडीयावरून) ओळख झाली होती. सोशलमिडीयावरून एकमेकाच्या संपर्कात असल्याने त्यांची काही दिवसांत मैत्रीत रूपांतर झाले. याच मैत्रीचा फायदा घेत आरोपी लवकुश खोब्रागडे याने स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देवुन त्या महिलेला एका लॉजवर घेऊन गेला. आणि त्या ठिकाणी त्याने स्वतःच्या मोबाईलने तिचे अनेक फोटो काढले. पुन्हा काही महिण्यानंतर जीव देण्याची धमकी देऊन बोलावले. घरी कोणाला काहीही न सांगता महिला त्या युवकासोबत घरून निघून गेली. पतीने तिची शोधाशोध केली. तिचा पत्ता लागल्यानंतर तिला घरी आणण्यात आले. आरोपी लवकुश खोब्रागडे याने आपल्या सोबतचे मैत्रीचे संबंध तोडल्याने तिची बदनामी करण्याच्या हेतूने महिलेचे नकळत काढलेले फोटो, फिर्यादीबाबत अश्लील लिहिलेले बदनामीकारक मजकूर फेसबुक, व्हाट्सअपच्या माध्यमातून महिलेच्या नातेवाईक आणि अन्य लोकांना व्हायरल केले. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार महिलेने चिमूर पोलिसात नोंदविल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीवर गुन्हा दाखल केला.
सोशल मीडीयावरून महिलेची बदनामी होत असल्याने पोलिसांनी याबाबत सायबर सेलची मदत घेतली. आरोपी बदनामीकारक मजकूर,फोटो व्हायरल केल्यानंतर डिलीट करीत होता. त्यामुळे तपासात तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने बदनामीकारक मजकूर कोण पोस्ट करीत आहे, याबाबतची ओळख पटविण्यात आली. त्यामुळे आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार सोनवणे, पोलिस अंमलदार प्रवीण गोनाडे, विशाल वाढई यांनी कारवाई केली.