रास्तभाव दुकानातून फोर्टीफाईड तांदूळ वितरीत करण्यास सुरुवात Fortified rice

Fortified-Rice
Fortified-Rice

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ

चंद्रपूर (प्रतिनिधी) :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी, देशातील गरीब जनतेस पौष्टिक धान्य उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार, दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जिल्ह्यात माहे, जून 2023 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या National Food Security Scheme लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानातून फोर्टीफाईड तांदूळ वितरीत करण्यास सुरुवात झाली आहे. फोर्टीफाईड तांदळामुळे नागरीकांच्या आहारात पोषकतत्त्वांचा समावेश होणार असल्याने शरीर निरोगी राहून कुपोषणासारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी वितरीत होणाऱ्या कच्च्या तांदळामध्ये फोर्टीफाईड दाणे मिश्रित करण्यात येत आहे. ज्यामध्ये, जीवनसत्व बी-12, फॉलिक ॲसिड व लोह या सूक्ष्म पोषकतत्वांचा समावेश आहे.  1 किलो तांदळामध्ये 10 ग्रॅम फोर्टीफाईड तांदूळ मिश्रित केला जातो. नियमित तांदळापेक्षा फोर्टीफाईड तांदळाचा रंग थोडासा पिवळसर असतो. फोर्टीफाईड तांदळाचे वजन नियमित तांदळापेक्षा कमी असते, त्यामुळे काही तांदळाचे दाणे पाण्यावर तरंगताना दिसतात. याबाबत नागरीकांनी गैरसमज न बाळगता फोर्टीफाईड तांदळाचा आहारात समावेश करावा.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, फोर्टीफाईड तांदळामध्ये लोह या जीवनसत्वाचा समावेश असतो. त्यामुळे थॅलेसेमिया ग्रस्त व्यक्तींनी फोर्टीफाईड तांदळाचे सेवन वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करावे तर सिकलसेल ॲनिमिया ग्रस्त व्यक्तींनी फोर्टीफाईड तांदळाचे सेवन पूर्णपणे टाळावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे यांनी कळविले आहे.