भाऊ प्रचार थंड का? मतदारांमध्ये चर्चा BJP campaign cold

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar

मूल शहरात सब शांती शांती है!

भोजराज गोवर्धन, मूल
ना पोष्टर, ना बॅनर, नाही, या मातीच्या सेवेसाठी आला सुधीरभाऊ या गाण्यांची रेकार्डींग वाजविणारे वाहन… 18 व्या लोकसभेच्या निवडणूकीची तारीख जवळ येवूनही ऐवढा थंड प्रचार का? एरवी प्रचारात योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करून, आघाडी घेणारे सुधीर मुनगंटीवार यांची प्रचार यंत्रणा मूल तालुक्यात ‘‘थंडा थंडा कुल कुल’’ आहे. असे का? या प्रश्नाची उत्तरे एक तर ते स्वतःच देतील किंवा येणारा काळ देईल, मात्र त्यांचा प्रचार थंड असण्यामागे निश्चितच काहीतरी गडबळ तर नाही ना अशी चर्चा जनसामान्यामध्ये आहे. Shudhir Mungantiwar

2009 मध्ये बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रातून सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविली. यापूर्वी मूल तालुक्यात भाजपाची यंत्रणा वाड्यातून चालायची. मात्र सुधीर मुनगंटीवार यांचे त्यावेळचे उमेदवारीस वाड्यांनी साथ न दिल्यांने, मुनगंटीवार यांनी निवडणूक फार्म भरण्यांचे एक महिणा अगोदरच त्यांनी केलेले कामे दाखविणारी मोठी पुरवणी चंद्रपूरची यंत्रणा आणून वाटप केली होती. प्रचाराचे व्यवस्थापनही चंद्रपूरवरूनच केले होते, भक्कम मतानी ते निवडूण आले. यानंतर, बल्हारपूर क्षेत्रातील मूल सह सर्व तालुक्यात प्रत्येक इवेंटचे मोठे-मोठे बॅनर लावण्यात मुनगंटीवारची यंत्रणा तत्पर आहे. अगदी परवा चंदनसिंह चंदेल यांचे वाढदिवसाचे बॅनरही दिमाखात झळकले. असे असतांना मुनगंटीवार यांचे प्रचाराचे बॅनर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरही नसल्यांने, अनेकांना आश्चर्य वाटत आहे. मूल तालुक्यात अजूनही प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले नाही. एकूणच प्रचाराचा कारभार थंडा थंडा कुल कुल आहे. भाऊच्या कार्यक्रमात पुढे-पुढे राहून त्यांच्या नावांवर करोडपती झालेलेही आता प्रचारात मागे मागे आहे. Mul City

लोकसभेत जाण्यांची सुधीरभाऊची इच्छा आणि तयारी नव्हती हे सर्वश्रृत आहे. त्यांनी तसे जाहीरही बोलून दाखविले आहे, यामुळेच तर त्यांनी प्रचाराकडे दुर्लक्ष केले नसावे ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे. कारण काय माहीत नाही, इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचे शेकडोच्या संख्येत गल्ली-बोळात बॅनर लागले असतांना, मूल शहराच्या महत्वाच्या मध्यवर्ती गांधी चौकात मुनगंटीवार यांचे एकही बॅनर नसावे याचीच चर्चा अधिक आहे.

मुनगंटीवारांच्या टीमचा सोशल मीडियावर भर
बदलत्या काळात प्रचार पध्दती पण बदलली आहे. सोशल मीडिया सद्या प्रभावशाली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने मुनगंटीवारांच्या टीमने त्या मोबाईलला केंद्रस्थानी ठेवुन प्रचार सुरू केला आहे. मोठया स्क्रिन व बॅनरवर उमेदवार दिसत नसला तरी प्रत्येकांच्या मोबाईलवर भाऊ आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांने दिली.