शेतकऱ्यांच्या रहदारीचा मार्ग कंपनीने केला बंद

तहसीलदारांकडे तक्रार: मार्ग सुरू करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

मूल (प्रतिनिधी) : आकापूर स्थित असलेल्या औघोगिक विकास महामंडळाच्या परिसरात नव्याने उभारण्यात येत आलेल्या कार्निवल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीने शेतकरी आणि नागरीकांचा अनेक वर्षांपासून ये-जा करण्याचा मार्ग काही दिवसापासुन बंद केलेला आहे, यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी व इतरत्र जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे, सदर रस्ता तात्काळ खुला करून दयावा अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला असुन त्याबाबतचे निवेदन त्यांनी सावलीचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना दिलेला आहे.

मूल तालुक्यातील आकापूर येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात अनेक कंपनी कार्यरत आहे, त्याठिकाणी नव्याने कार्निवल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमीटेड ह्या कंपनीने काही दिवसांपासुन  काम सुरू केले असुन काही दिवसांपुर्वी खोदकाम करून व माती टाकुन तारेचे कंपांउंडचे काम केलेेले आहे. सदर कंपाउंडमुळे चिमढा व टेकाडी येथील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास होत असुन शेती करणे अडचणीचे झालेले आहे.

सदर तारेच्या कंपाउंडमुळे यावर्षी शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विविध समस्येला सामोरे जावे लागत असुन अनेक शेतकऱ्यांना शेती सुध्दा करता येणार नसल्यामुळे काही शेतकऱ्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे प्रशासनाने तात्काळ तारेचे कंपांउंड काढुन रहदारीचा मार्ग मोकळा करून देण्याची मागणी गजानन चौधरी, एकनाथ मांदाडे, अरूण मांदाडे, रविंद्र चौधरी, माधव चौधरी, विजय चौधरी, मायाबाई चौधरी, भगवान मोहुर्ले, दादाजी चौधरी, भगवान चोधरी विठोबा चोधरी, सुनिल चौधरी, ओमदेव मोहुर्ले, बंडु सोनुले, सुरेश सोनुले यांनी उपविभागीय अधिकारी मूल, आणि सावलीचे तहसीदार यांचेकडे केली आहे.

  तलाठीमार्फत चौकशी करून नियमानुसार कारवाई करू : तहसीलदार पाटील
कुक्कुड चिमढा येथील शेतकऱ्यानी दिलेल्या तक्रारीवरून तलाठी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे, चौकशीमध्ये जे काही निष्पण होईल त्यानुसार कारवाई करू अशी प्रतिक्रीया सावलीचे तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी दे धक्का एक्सप्रेसशी बोलताना दिली.

तारेचे कंपांउंड आमचे जागेतुनच  :  सय्यद मुक्तबिर
औद्योगिक विकास महामंडळाने कार्निवल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीला जमिन दिलेली आहे, कंपनीला दिलेल्या जागेतुनच तारेचे कंपाउंड तयार करण्यात आलेले आहे, कोणताही रहदारीचा मार्ग कंपनीने बंद केलेला नाही अशी प्रतिक्रिया कार्निवल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सय्यद मुक्तबिर यांनी दे धक्का एक्सप्रेस शी बोलतान दिली.