‘‘त्या’’ रस्त्याकडे नगर पालीकेचे दुर्लक्ष

नागरीकांना होतोय त्रास : रस्ता दुरूस्ती करण्याची नागरीकांची मागणी

मूल (प्रतिनिधी) : सततधार पावसामुळे वार्डात साचुन असलेले पाणी जाण्यासाठी नगर पालीकेने रस्ता फोडुन मधोमध सिमेंट पाईप टाकण्यात आले, त्यामुळे साचुन असलेल्या पाणी गेले मात्र फोडुन ठेवलेला रस्ता तसाच असल्याने नागरीकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नगर पालीकेने ‘‘त्या’’ रस्त्याकडे लक्ष देवुन तात्काळ पाईप बुजविण्यात यावे अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

मूल येथील नागपूर मार्गावरील एच डी एफ सी बॅंकेच्या बाजुने नगर पालीकेने रस्ता बनविला आहे, मात्र पावसाचे पाणी जाण्यासाठी यारस्त्यावर कुठेही पाईप टाकण्यात आलेले नाही, यामुळे सततधार पावसामुळे यापरिसरात पाणी साचुन होते, पाणी जाण्यासाठी नगर पालीकेने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता फोडुन त्याठिकाणी पाईप टाकण्यात आले, सदर घटनेला जवळपास एक महिणा लोटुन गेला मात्र पाईप टाकलेल्या ठिकाणी अजुनही बुजविले नाही, यामुळे नागरीकांना विशेषतः विद्यार्थ्यांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सदर मार्गावरील काही ठिकाणची नाली मागील वर्षी नगर पालीकेनी तोडली मात्र अजुनही दुरूस्ती करण्यात आलेली नाही, सदर रस्ता आणि नालीची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.