घराच्या पट्ट्यासाठी राबविणार विशेष मोहीम
मूल (प्रतिनिधी) : मूल नगरपरिषद निवडणूक जवळ येत असताना शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर उमेदवारांकडून ठोस आश्वासने दिली जात आहेत. यामध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ यांनी जाहीर केलेली “बेघरांना हक्काचा निवारा” ही योजना शहरात विशेष चर्चेचा विषय बनली आहे. अनेक वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांसाठी हे आश्वासन मोठा दिलासा मानले जात आहे. Ekta Samarth
एकता समर्थ यांनी स्पष्ट केले की, मूल शहरातील अनेक कुटुंबे आजही झोपड्यांमध्ये, भाड्याच्या खोल्यांत किंवा तात्पुरत्या शेडमध्ये राहत असून शासनाच्या विविध योजना असूनही योग्य मार्गदर्शन आणि प्रक्रिया सुलभ नसल्याने त्यांना हक्काचे घर मिळत नाही. या वास्तविक समस्येची जाणीव ठेवून नगरपरिषदेत सत्तेवर आल्यानंतर बेघर कुटुंबांची स्वतंत्र यादी तयार करून विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या सर्वेक्षणाच्या आधारे पात्र कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनांचे लाभ देण्यासाठी वेगवान प्रक्रिया आखली जाईल. “कोणालाही घर मिळण्यासाठी वर्षानुवर्षे दारात-दरात फिरावे लागणार नाही. घर हे प्रत्येक नागरिकाचा प्राथमिक हक्क आहे आणि तो हक्क मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे एकता समर्थ यांनी ठामपणे सांगितले. घरपट्ट्यांसाठीही स्वतंत्र ‘विशेष प्राधिकरण मोहीम’ राबविली जाणार असून दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली पट्ट्यांची प्रकरणे निकाली काढण्यावर भर देण्यात येईल. अनेक कुटुंबे दशके एका जागेवर राहतात, परंतु दस्तऐवजाअभावी त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी पारदर्शक व कालबद्ध कार्यपद्धती लागू केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
समर्थ दांपत्याने पूर्वीपासूनच सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेतली आहे. शहरातील गोरगरिबांना वेळोवेळी दिलेल्या मदतीमुळे त्यांच्या नेतृत्वाबद्दल लोकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे घरकुल आणि घरपट्ट्यांबाबत त्यांनी दिलेले आश्वासन मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा निर्माण करत आहे. या घोषणेमुळे बेघर, भाडेकरू, तसेच असुरक्षित निवाऱ्यात राहणाऱ्या नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून मूल शहरात ‘हक्काच्या घराचा मुद्दा’ या निवडणुकीतील महत्त्वाचा अजेंडा ठरू लागला आहे.









