विसापुरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन समस्या निकाली काढणार : जि. प. सीईओ मिताली शेट्टी यांचे आश्वासन

ग्रामपंचायत शिष्टमंडळानी दिले निवेदन

विसापूर  (प्रतिनिधी) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत मधील प्रभाग क्रमांक एक मधील सांडपाणी व्यवस्थापन समस्या कित्येक दिवसापासून प्रलंबित आहे. या समस्येचे निराकरण करण्यात यावे, यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. मिताली शेट्टी यांना गुरुवारी निवेदन सादर करून मागणी करण्यात आली. यावेळी त्यांनी विसापूर ग्रामपंचायत मधील सांडपाणी व्यवस्थापन समस्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन ग्रामपंचायत शिष्टमंडळाला दिले.

बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. येथील लोकसंख्या १८ हजारावर आहे. येथील प्रभाग एक मधील सांडपाणी व्यवस्थापन समस्या कित्येक दिवसापासून प्रलंबित आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही समस्या तातडीने सोडविण्यात यावी, म्हणून विसापूर ग्रामपंचायत सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, हर्षला टोंगे, ग्रामपंचायत लिपिक संतोष निपुंगे, प्रभारी ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ.मिताली शेट्टी यांना निवेदन सादर करून समस्या मार्गी लावण्याची विनंती केली.

यावेळी डाँ. मिताली शेट्टी यांनी शोष खड्डे निर्मित नाली बांधकामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून सांडपाणी व्यवस्थापन समस्या निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.त्याचप्रमाणे विसापूर ग्रामपंचायत मधील डाँ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड क्रमांक एक, सिद्धार्थ वार्ड क्रमांक दोन, अशोक नगर वार्ड क्रमांक तीन मधील दलित वस्ती सुधारणा अंतर्गत प्रलंबित विकास कामे, विसापूर फाट्यावर प्रवेशद्वार बांधकाम जिल्हा निधीतून करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची निवेदनातून मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. मिताली शेट्टी यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. निवेदन देणाऱ्या विसापूर ग्रामपंचायत शिष्टमंडळात विसापूर येथील सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, हर्षला टोंगे, ग्रामपंचायत लिपिक संतोष निपुंगे यांचा समावेश होता.