कॉंग्रेसच्या उमेदवारांना मतदान करा : ना. विजय वडेट्टीवार

पोंभुर्णा येथील जाहीर सभेत प्रतिपादन

पोंभुर्णा (प्रतिनिधी) : झाडाच्या खाली झाड कोणी लावतात काय, हा विकास आहे काय, 5 वर्षे वनमंत्री राहीले मात्र वनजमीनचा पट्टा एकालाही मिळाला नाही याचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे म्हणुन कॉंग्रेसला मतदान करा असे आवाहन राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुर्नवसनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते पोंभुर्णा येथील राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या प्रचार सभेला संबोधीत केले.
पोंभुर्णा येथील गुजरी चौकात आयोजीत सभेला महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस मुजिफभाई पठाण, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी, तालुकाध्यक्ष कवडुजी कुंदावार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, राकेश रत्नावार आदी मान्यवर उपस्थित होते.
पोंभुर्णा नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेस पक्षानी तयार केलेल्या जाहिरनाम्याचे नामदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पोंभुर्णा नगर पंचायतच्या इमारतीला अनुसरून नामदार वडेट्टीवार पुढे म्हणाले ‘‘लहान पोराच्या हातात अख्खा बकरा खायला दिला, काय गती होईल या इमारतीचे, हाच पैसा जर रोजगार देण्यासाठी लावले असते, उद्योग देण्यासाठी लावले असते तर पोंभुर्णात एकही बेरोजगार राहीला नसता”
यावेळी घनश्याम मुलचंदानी, संतोषसिंह रावत, प्रकाश देवतळे यांनी सभेला संबोधीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कवडु कुंदावार यांनी केले. संचालन अतिक कुरेशी यांनी केले. कार्यक्रमाला नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये उभे असलेले सर्व उमेदवार, नागरीक उपस्थित होते.