दोन वर्षांपासून रखडले बांधकाम : गळक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन
सुधाकर दुधे, सावली
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करगाव येथील एका वर्गखोलीचे बांधकाम दोन वर्षापासून रखडले आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या अनुषंगाने निर्लेखित व पळक्या ग्रामपंचायतीच्या इमारतीत एक वर्ग भरत आहे. मात्र पावसाळ्यात ही इमारत गळत असल्याने त्या गळक्या इमारतीत विध्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यामुळे ‘‘टिप टिप बरसा पाणी’’ या गाण्याचा प्रत्यय विध्यार्थ्यांना दररोजच येत असल्याचे वास्तव आहे.
सावली तालुक्यातील करगाव येथील जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेची पटसंख्या 92 असून तीन शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे शिकवीत आहेत. सध्या शाळेत दोनच वर्गखोल्या आहेत. निर्लेखीत असलेल्या एका वर्गखोलीचे बांधकाम दोन वर्षांपासून रखडले आहे. परिणामी जुन्या ग्रामपंचायतमध्ये दोन वर्गना ज्ञानार्जन केले जाते. मात्र हिसुद्धा इमारत निर्लेखित झाली आहे. तसेच पावसाळ्यात चक्क ही इमारत गळत असते. त्याही स्थितीत विध्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक भविष्यासाठी ज्ञानार्जन करावे लागत आहे. मात्र या स्थितीमुळे पालक व विध्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
शाळेसाठी दोन एकर जागेला मंजुरी
करगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंचानी पुढाकार घेऊन दोन एकर जागा जि. प. शाळेला उपलब्ध करून दिली. त्यामुळे निर्लेखित झालेल्या एका वर्गखोलीच्या बांधकामास नवीन जागेवर सुरुवात करण्यात आली. मात्र दोन वर्षांपासून हे बांधकाम रखडले आहे. सबंधित विभागाने दखल घेऊन बांधकामाला गती द्यावी, अशी मागणी पालकवर्गांकडून होत आहे.
शाळेला क्रीडांगण नाही
सद्या ज्याठिकाणी शाळा भरत आहे. त्याठिकाणी क्रीडांगण नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यास अडचण येत आहे. मात्र नवीन इमारतीची दोन एकर नियोजित जागा असल्याने भविष्यात क्रीडांगण उपलब्ध होणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करगांव येथील सन २०२३- २४ या सत्रातील वर्ग १ ते ५ ची पटसंख्या 92 आहे. शाळेमध्ये शिक्षक संख्या तीन असून अध्यापनासाठी २ वर्गखोल्या उपलब्ध आहेत. एका वर्गखोलीचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम पूर्ण झाले नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात जुन्या ग्रामपंचायतीमध्ये एक वर्ग भरविण्यात येतो.
बी एम. मेश्राम मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा करगाव